खामगाव : तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या लासुरा जहागीर येथे घराची खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने घरामध्ये ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लासुरा जहागीर येथील बाळू जगदेव तायडे वय ५२ वर्ष यांनी खामगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की ते
त्यांच्या कुटुंबीयांसह घरामध्ये झोपलेले असताना घरातील खिडकी तोडून अज्ञात आरोपीने घरात प्रवेश केला व कोठीतील भांड्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, पितळी भांडे आणि कुकर,सोन्याची पोत असा एकूण ३६ हजार रुपयाचा माल लंपास केला. त्यांनी दिलेल्या या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका गणेश जाधव हे करीत आहेत.