वॅक्सीन असताना हि दिल्या जात नसल्याने व नियोजन नसल्याने जेष्ठ नागरिकांना हेलपाटे
शेगांव : येथील लसीकरणासाठी ॲपवर नोंदणीपासून केंद्रावर लशीचा डोस मिळेपर्यंत होणाऱ्या प्रक्रियेत आज कमालीचा गोंधळ उडाला. एकतर नोंदणी होत नाही, ती झाली तर वेळ व दिवसाचा स्लॉट मिळत नाही. स्लॉट मिळाला तरी डोस मिळण्यात अडचणी… अशा एक ना अनेक तक्रारी आज समोर आल्यात. त्यामुळे तासन्तास लाभार्थी ताटकळले आणि त्यातून संतप्त झालेल्या नागरिकांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालत वाद घातले. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १ मेपासून १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीच्या पाच दिवसांत लशींचा साठा नसल्याने हे लसीकरण प्रत्यक्ष सुरू होऊ शकले नाही. शिवाय ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीचे लसीकरणही लशींच्या साठ्याअभावी थंड बस्त्यात होते. शेगावात मात्र आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. ४५ वर्षावरील नागरिकांनि दुसऱ्या डोज साठी रांगा लावल्या मात्र ऎन वेळेवर दुसरा डोज मिळणार नसल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी जाहीर करताच नागरिकांचं संताप अनावर झाला. यावेळी स्थानिक नगरसेवक दिनेश शिंदे हे रुग्नालयात पोहचल्यानंतर नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या असुविधांचा पाढाच वाचला. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे खाजगी सुरक्षारक्षकांसह पोलिसांनाही पाचारण करावे लागले. दुसरा डोज देणे बाबत वरिष्ठांच्या आदेशानंतरच लसीकरण सुरु होईल असे रुग्नालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांना आज लशीचा डोस घेतल्याविना परतावे लागले.