मुंबई : जगभरात महिला आणि कार्यकर्ते मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत .मात्र समाजाच्या मानसिकतेत फरक पडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे याची प्रतीची प्रचिती देणारी घटना गुजरातमध्ये घडली आहे.एका व्यक्तीने मासिक पाळी आल्याचे न सांगितल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.लग्नाच्या दिवशी मासिक पाळी आलेली होती,मात्र त्या विषयी माहिती दिली नाही म्हणून आरोपीने घटस्फोट मागितला आहे. लग्नाच्या दिवशी पाळी आल्याचे न सांगून माझा व माझ्या आईचा विश्वासघात केला आहे असा आरोप वडोदरा येथे राहणार्या व्यक्तीने केला आहे. लग्नाचे विधी पत्नीने मासिक पाळी असताना केला, त्यानंतर मंदिरात जाण्याची वेळ आली तेव्हा पत्नी मासिक पाळी आली असल्याचे सांगितले असे पतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता.मासिक पाळी जरी साधारणतः २८ दिवसांनी येत असली तरी ती नेमकी किती तारखेला येणार हे कोणत्याच मुलीच्या हातात नसते. शिवाय पाळीच्या आधी झालेली धावपळ, मानसिक ताण तणाव यामुळे बऱ्याचदा पाळीची अपेक्षित तारीख मागे पुढे होत असते. असंच काहीसं या ही प्रकरणात झालं असेल कारण कुठल्याही मुलीला ऐन समारंभात पाळीचा त्रास सहन करत सगळं करण्याची नक्कीच हौस नसते. तरीही या केसमधील नवरीने तो त्रास विनातक्रार सहन करत लग्नाचा अख्खा दिवस कसा काढला असेल या कल्पनेनेच बेचैन व्हायला होतं. पण या सर्व बाबींची पुसटशी ही कल्पना नसलेल्या एका अक्कलशून्य माणसाला जर हा विश्वासघात वाटत असेल तर त्याची याच काय पण कोणत्याच मुलीशी लग्न करण्याची लायकी नाही. असं असलं तरी या कारणामुळे घटस्फोट आपण मान्य करू शकत नाही. या घटनेचा समाजबंध तीव्र निषेध करत आहे. अघोरी कृत्यांचा निषेध हा विधायक कृतीतूनच करण्याचा समाजबंधचा पायंडा आहे; या घटनेचा निषेध करताना अंधश्रद्धांमुळे अशा घटना होऊ नयेत म्हणून नव विवाहित नवऱ्यांसाठी व विवाहेच्छूक मुलांसाठी ‘बायकोचं शरीर आणि मन’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम समाजबंध आयोजित करणार आहे.पाळीला देवा धर्माशी जोडून विटाळ पाळणं ही मोठी शोकांतिका आहे. एवढीच पाळीची अडचण वाटत असेल तर अशा लोकांनी लग्नाची तारीख मुहूर्त बघण्याऐवजी मुलीच्या पाळीच्या तारखा बघून ठरवावी; निदान नवरीची दगदग तरी होणार नाही. मासिक पाळी ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असून देखील समाजावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा व मासिक पाळी विषयी असणारे अज्ञान यामुळे त्या पाच दिवसांच्या काळात महिलेकडे अपवित्र म्हणून पाहण्याची वृत्ती दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. फक्त स्त्रियाच नाही, तर प्रत्येक पुरुषाला देखील मासिक पाळी विषयी ज्ञानाने समृद्ध करण्याची गरज आहे. ही घटना गुन्हा दाखल झाला म्हणून समोर आली; परंतु चार भिंतीच्या आत अशा कित्येक घटना दररोज घडत असतील असे समुपदेशक शर्वरी सुरेखा अरुण व राहुल मीनाक्षी शिवानंद बिराजदार यांनी सांगितले.