लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना 1921-22 या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथल्या चार मजली इमारतीत राहिले होते. ही इमारत लंडनमधील हेन्री रोडवर आहे. ही इमारत खासगी होती व महाराष्ट्र शासनाने ही इमारत 30 कोटी रुपयांना विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक बनवलं.
या स्मारकाचं नूतनीकरणाचं काम महाराष्ट्र सरकारने भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून सुरू केलं होतं. पण हेन्री रोड ज्या भागात आहे त्या स्थानिक प्रशासनाने म्हणजेच कॅमडन काउन्सिलने आक्षेप घेतला होता.
हा भाग निवासी असल्यामुळे डॉ.आंबेडकरांच्या सदनाला भेट देणाऱ्या लोकांमुळे स्थानिक लोकांना त्रास होतो असा आक्षेप कॅमडन काउन्सिलने यांनी घेतला होता. हा वाद न्यायालयात गेला व हा खटला भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने जिंकल्यामुळे आता या स्मारकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्मारकाला किमान 50 जण आठवड्याला भेट देतात. या स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी देखील भेट दिली होती.