पोलीस व महसूल प्रशासन लक्ष देणार का ?
खामगांव : गेल्या कित्येक वर्षापासून सर्रासपणे अवैध रेतीचा उपसा राजकीय वरदहस्ताने महसूल व पोलीस विभागाच्या मोठमोठे अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन राजरोसपणे भर चौकातून रेतीच्या गाड्यांनी वाहतुक करणे खुलेआम सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून रेतीची अवैध उत्खनन व वाहतूक सर्रास सुरू असल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून हा महसूल वाचवणे करतात संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रेती तस्कर रेतीचा अवैध उपसा आणि वाहतुकीसाठी राजकीय नेत्यांची मदत घेत असल्याने त्यांच्या विरोधात प्रभावी कारवाई केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. राजकीय नेत्यांचे त्यांना सहकार्य असल्याने रेती वाहतूकदार बिनधास्तपणे दिवसाढवळ्या वेगाने वाहन चालवत शहरातून जात आहेत. एखाद्या रेतीच्या गाडीला जर पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासनाकडून पकडण्यात आले तर त्या राजकीय नेत्याचा तात्काळ फोन येतो व गाडी सोडण्यास सांगितले जाते. आणि जर गाडी सोडा अन्यथा तुमच्यावरच कारवाई करण्याचे सांगितले जाते. मागील महिन्यात एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रकार सुद्धा गोपाळ नगर भागात घडला होता.

त्यावेळी रेती गाडीच्या मालकाने राजकीय नेत्याला फोन लावून सदर प्रकरण रफादफा करण्यास सांगितले. दिवसंदिवस रेती वाहतूकदारांची मुजोरी व दहशत वाढत आहे, त्यामुळे नागरिकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा रेती वाहनाचे मालक हे पोलीस स्टेशन समोर तहसीलदार यांचा बंगला, जलंब नाका, वाडी, माक्ता-कोक्ता नांदुरा रोड या ठिकाणी दिवसभर व रात्री टोळक्यांनी उभे असतात. याबाबत माहिती घेतली असता सदर मालक हे याठिकाणी पोलीस व महसूल विभागाच्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उभे असतात. या सर्व ठिकाणी रात्री-बेरात्री उभे राहण्याची नेमकी गरज काय ? व पोलीस प्रशासन रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना यांना हटकच सुद्धा नाही व त्यांची विचारपूस का करत नाहीत ? असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो. तालुक्यात रेती तस्करांमध्ये प्रचंड स्पर्धा झाली असून यातून गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहेत. त्यांनी आपापले परिसर वाटून घेतले आहेत शिवाय उपसा करून आणलेली रेती शहरात अनेकांना दमदाटी करून मोकळ्या जागेत साठवण्यात येत असल्याने ही नागरिकही त्रस्त झाले आहेत. याची तस्करांना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याने त्यांची मुजोरी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या तस्करांची पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण राहील हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे.