खामगांव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्ञानगंगापूर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी तुकडोजी महाराज व राष्ट्रधर्म याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्ञानगंगापूर येथे विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामसफाई, वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, पालखी सोहळा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगापूर चे सरपंच ज्ञानेश्वर महाले हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार सुशील महाराज वणवे हे होते. यावेळी कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी प्रचारक राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज आश्रम मोझरी, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांचा तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर, पत्रकार अमोल गावंडे, कुणाल देशपांडे व भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष संघपाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोबतच या कार्यक्रमा दरम्यान कोरोना काळात आपली सेवा बजावणाऱ्या गावातील कोरोना योद्धा रुग्णवाहिका चालक गणेश वनारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक प्रार्थना करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाला गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प अरुण महाले यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंता महाले यांनी केले.
previous post