नांदुरा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती स्थानिक देशमुख परिवारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटोचे निलेश देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात करुन फोटोला हारार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. निलेश देशमुख यांनी राष्ट्रसंतांच्या जीवन व कार्याला यावेळी उजाळा दिला. राष्ट्रसंतांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून समाज प्रबोधन केले, ग्रामगीता मधून ग्रामविकासाला चालना दिली, स्वातंत्र्य लढा व राष्ट्रीय कार्यातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. अशा राष्ट्रसंतांच्या विचारांची समाजाला आजही गरज आहे, ते लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्या कृतीत उतरावेत असे मत यावेळी निलेश देशमुख यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंतांनी समाजहिताचे व राष्ट्रोध्दाराची असंख्य कामे केलीत, आपण सुद्धा प्रेरणा घेऊन एखादा छोटासा उपक्रम राबविला पाहिजे असे मत निलेश देशमुख यांनी व्यक्त केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निलेश देशमुख यांनी वृक्षांच्या ५ हजार बिया रुजविण्याचा संकल्प केला आहे व आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती दिनापासून त्यांनी बिया गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आंबा, चिंच, कडुलिंब, चिकू, आवळा, बदाम, लिंबू यांसारख्या झाडांच्या एक हजार पेक्षा जास्त बिया त्यांनी आज संकलित केल्या. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे १४ मे पासून ते या बियांच्या कागदी पुड्या किंवा पाकिटे तयार करणार आहेत व बिया रुजविण्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकदिन ६ जून पासून सुरू करणार असून २६ जून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी ते आपला वृक्षांच्या पाच हजार बिया रुजविण्याचा संकल्प पूर्ण करणार आहेत. अश्या निसर्गस्नेही, पर्यावरणवादी, समाज हितकारी, उपक्रमात नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे आपापल्यापरीने सर्वांनी यात सहभाग घेतला व घरी आलेल्या फळांमधील बिया गोळा करून त्या पावसाळ्याच्या सुरुवातीस जून महिन्यात जमिनीमध्ये रुजविल्यास निसर्ग संवर्धनाची व पर्यावरण रक्षणाची ही एक लोक चळवळ ठरेल. निसर्गाकडून आपण आयुष्यभर भरभरून बरेच काही घेत असतो थोडीफार परतफेड म्हणून त्यांच्या निस्वार्थ उपकाराची जाण ठेवून तरी आपण निसर्गा विषयी थोडं कार्य करणे आपले कर्तव्य मानावे.असे निलेश देशमुख यांनी सांगितले.याप्रसंगी रामराव देशमुख, मंगेश देशमुख, अर्णव देशमुख, आरोही देशमुख, अद्विक देशमुख यांची उपस्थिती होती.
previous post