खामगाव : येथील जोहारले ले आऊट मध्ये राहणारे केबल ऑपरेटर अशोक उत्तम बनचरे यांचा मंगळवार दि.१४ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३४ वर्षे होते. अशोक बनचरे हे सोमवार दि. १३ डिसेंबर रोजी आपले ड्राइविंग लायसन चे नूतनीकरण करण्यासाठी ऍक्टिवा या दुचाकी वाहनाने बुलढाणा येथे गेले होते. तेथून काम आटोपून ते सायंकाळी घरी परत येत असतांना बुलढाणा – बोथा घाटातील देव्हारी फाट्याजवळ अशोक बनचरे यांच्या दुचाकीला मागून कुण्यातरी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये अशोक बनचरे हे गंभीररीत्या जखमी झाले, ते रक्तबंबाळ जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले असतांना रस्त्यावरून जाणारे शेतकरी संघटनेचे नेते कैलास फाटे , सागर बेटवाल व सहकाऱ्यांना ते जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन व ॲम्बुलन्स ला फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. गंभीर जखमी झालेले अशोक बनचरे यांना प्रथम उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले.
मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना औरंगाबाद येथे रेफर करण्याचे सांगितले . बुलढाणा येथून ॲम्बुलन्स द्वारे अशोक बनचरे यांना औरंगाबाद येथील दुनाद प्रायव्हेट लिमिटेड हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्यांच्या मेंदूला जबर मार लागल्यामुळे त्यांच्यावर मंगळवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी अशोक बनचरे यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ऑपरेशन नंतरही त्यांची प्रकृती स्थिर होती. उपचारा दरम्यानच मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. अशोक बनचरे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व्यक्तीतमत्व होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या मित्रपरिवारा मध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा १ मुलगी, १ भाऊ,२ बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवार दि.१५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांचे जोहारले ले आऊट भागातील राहत्या घरुन निघणार आहे. अशोक बनचरे यांना निर्भिड स्वराज्य परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…