खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या परिस्थितीत देखील खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये मुबलक प्रमाणात रक्तासाठा उपलब्ध आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारने देशभरात लॉकडाउंन घोषित केले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, इतर सर्व दुकाने बंद आहेत. रस्त्यावर शुकशुकाट असून, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे मोजकेच वाहने रस्त्यावरून धावताना दिसतात. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी झाली. केवळ कोरोनाचा संशय असलेले रुग्णच सरकारी दवाखान्यांमध्ये येत आहे. किरकोळ आजार असल्यास लोक दवाखान्यात न जाता, घरीच इलाज करण्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा शिल्लक आहे.
मध्यांतरी काळात कोरोनाच्या भीतीपोटी रक्तदान करणाऱ्यांची संख्या मात्र, कमी होत असल्यामुळे राज्यात रक्त साठ्यात तुटवडा भासण्याचे संकट उभे असताना आरोग्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री तसेच बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते, त्यास प्रतिसाद देत, ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. यासंदर्भात रक्तपेढीतील रक्तसाठ्याची माहिती घेतली असता रक्त पेढीमध्ये ३०० ते ३५० पिशव्या रक्तसाठा शिल्लक असून १४ जुलै पर्यंत हा रक्तसाठा पुरेल. यामध्ये सर्वच रक्तगट उपलब्ध आहेत. तसेच सध्या थेलेसेमिया,अनेमिया व सिझर च्या पेशंट ला नियमित रक्ताचा पुरवठा होत आहे. व या रक्तपेढी तून नांदुरा, शेगाव, काही खाजगी दवाखाने व इतर गावांमध्ये रक्ताची निर्यात केली जाते. २०१९ मध्ये साधारणतः ३००० पिशव्या रक्ताचे संकलन झाले होते. तसेच रक्तपेढीचे कॅम्प नेहमी विविध ठिकाणी, छोट्या तून छोट्या शहरात घेतले जातात. एका वर्षामध्ये जवळ जवळ ८० कॅम्प रक्तपेढीच्या मार्फत घेतले जातात.
सध्या अनेक आयोजक, समाज सेवक,सामाजिक संघटना, राजकीय पक्ष रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत, मात्र रक्तपेढी मध्ये रक्ताचा साठा मुबलक प्रमाणात असल्याने व हा रक्तसाठा पुढील ३४ दिवस चालतो त्यामुळे दात्यांचे नाव लिहून घेऊन जेंव्हा गरज भासेल तेंव्हा त्यांच्याकडून रक्तदान करून घेण्यात येणार आहे. परंतु सध्या या रक्तपेढी मध्ये रक्त विलागिकरन कक्षाची गरज भासत आहे. रक्तपेढी चे सर्व कामकाज निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीचे वरिष्ठ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सुरेंद्र छाजड, डॉ प्रणाली देशमुख, राजश्री पाटील, देशपांडे मॅडम पाहतात.
रक्तदात्यांनी इतरांची वाट न पाहता स्वतः रक्तपेढी मध्ये येऊन रक्तदान करावे तसेच यापुढे आयोजकांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिर आयोजित करावे असे आवाहन रक्तपेढीचे वरिष्ठ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सुरेंद्र छाजड यांनी आज रक्तदाता दिनानिमित्त निर्भिड स्वराज्य शी बोलतांना केले आहे.