मुंबई : संपूर्ण देशात काल १ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षावरील व्यक्तिंना कोरोनाची लस देण्यात येत आहे. मात्र, २० ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याने राज्यात १८ वर्षांवरील तरुणांना सरसकट कोरोनाची लस देण्यात यावी त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे.

यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घ्यावी, असं पटोले यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे असेही ते म्हणाले.