बुलडाणा,(जिमाका) : म्युकर मायकोसीस या आजाराच्या उपचारावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रूग्णालयांमध्ये उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावर उपचाराकरीता महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतगंर्त सर्जीकल पॅकेज 11 व मेडीकल पॅकेज 8 उपलब्ध आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत प्रति कुटूंब प्रति वर्ष 1.50 लक्ष रूपये एवढे विमा संरक्षण आहे. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये प्रति कुटूंब प्रति वर्ष 1.50 लक्ष रूपये पर्यंत विमा संरक्षण आहे. त्यापुढे हमी तत्वावर 5 लक्ष रूपया पर्यंत संरक्षण आहे. तसेच म्युकर मायकोसीस आजारावरील या आजारापूर्वी बाधीत व्यक्तीवर अथवा त्याच्या कुटूंबातील व्यक्तीवर उपलब्ध विमा संरक्षणापैकी काही रक्कम खर्च झालेली असू शकते. म्युकर मायकोसिस आजारावरील उपचाराकरीता योजनेतील विविध पॅकेज एकत्रितरित्या व वारंवार पुर्नवापर करावा लागण्याची शक्यता आहे. या दोन्ही आरोग्य योजनांमध्ये अनुज्ञेय विमा संरक्षणापेक्षा अधिक खर्च आल्यास अधिकचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर भागविण्यात येणार आहे. या आजारावरील उपचारामध्ये अँटी फंगल औषधे हा महत्वाचा भाग आहे. संबंधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध असून महागडी आहेत. शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहीत कार्यपद्धती अनुसरून संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व अंगीकृत रूग्णालयास पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत सनियंत्रण केले जाईल. म्युकर मायकोसिस आजाराची तीव्रता जास्त प्रमाणात असून याकरीता बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासते. तसेच याकरीता येणारा खर्च ही जास्त आहे. यामुळे खाजगी रूग्णालयातील उपचारावरील खर्चामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार योजनांच्या अंगीकृत रूग्णालयातून करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.