डिस्चार्ज घेतांना रुग्ण महिला व जिल्हा शल्य चिकित्सक झाले भावुक
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात उपचार घेऊन दुरुस्त झालेल्या दोन कोरोना रुग्णांना ३० एप्रिल रोजी दवाखान्यातून सुटी देण्यात आली यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. त्यांना जिल्हा आरोग्य प्रशासनाने आनंदाने निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रुग्णांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णांचा चेहरा आनंदीत होता.
निरोप घेतांना रुग्ण महिलेला अक्षरशः गहिवरून आले, आणि त्यांनी आसवांना वाट मोकळी करून दिली, त्यांना पाहून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांना देखील अश्रू अनावर झाले यावेळी कोरोना ग्रस्त रुगणांसाठी सर्वच प्रकारची अतिशय चांगली व्यवस्था असल्याने ही महिला आरोग्य विभागप्रति कृतज्ञता व्यक्त करायला विसरली नाही.
यावेळी सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.