चिखली-: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मेरा खुर्द येथील काही युवकांनी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी उपस्थित जमावाने रात्रीच्या वेळी मेरा चौकी येथील काही दुकानांना लक्ष्य करीत तोडफोड केल्याचीही घटना घडली. या घटनेचे वृत्त काही क्षणातच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिवभक्तांना कळताच घटनेच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाभर ठिकठीकाणी याचे तीव्र पडसाद उमटले. तर चिखली शहरात सकाळपासुनच तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी शहरात नाकाबंदी करीत जमाव बंदी केली होती. मात्र संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बाबुलॉज चौक परिसरात दुकाने बंद करण्याकरीता गेलेल्या जमाव आणि स्थानिक दुकानादारांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाल्याने काही वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करीत याठिकाणी बंदोबस्त वाढवून शांतता प्रस्थापित केली.याबाबत पोलीसांद्वारे प्राप्त माहितीनुसार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मेरा चौकी येथील काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे रात्रीपासूनच तणावपूर्ण परीस्थिती निर्माण झाली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मेरा चौकी येथील सलमान शेख सलीम, शेख सोहेल शेख रफिक, तौसिफ शहा बशीर शहा, तोहित शहा इब्राहीम शहा, अनिस शहा सांडू शहा या युवकांना ताब्यात घेऊन इतर चार पाच मुस्लीम समाजातील लोकांविरुद्ध अप. क्र. ४३/२३ कलम १५३ अ, २९५ अ, ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली. सदर घटनेचा पडसाद दुसऱ्या दिवशी जिल्हाभर पाहावयास मिळाले.या घटनेच्या निषेर्धात व आरोपींविरुद्ध कठोर शासन व्हावे याकरिता आज दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाज व शिवभक्तांच्यावतीने चिखली बंद चे आवाहन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित जमावाने शहरातून रस्त्यांवर फिरून दुकाने बंद करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यासाठी एकत्रित झाले. याठिकाणी उपस्थित जमावाने पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कदम व ना. तहसीलदार मुंढे यांना निवेदन दिले. या ठिकाणी दुपारी बारा वाजेदरम्यान सदर आंदोलन संपल्याचे जाहीर करण्यात येऊन आवाहन कर्ते तेथून निघुन गेले.या नंतर दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान काही युवकांचा जमाव बाबूलॉज परिसरात येऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असतांना काही दुकानादारांसोबत किरकोळ वाद निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमावाला दूर करून बाबूलॉज परिसराकडे येणारे सर्व रस्ते बंद केलेत. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी शहरात येऊन घटनेचा आढावा घेतला. दिवसभर पोलिसांनी शहरात जमाव बंदी लागू केली असून कडक पहारा ठेवला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे व कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले.
मेरा खुर्द येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय असून पोलिस प्रशासन अशा प्रकाराला कधीही थारा देत नाही. दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये अजूनही लोक असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेऊन लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल. तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.
सचिन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी