जलंब:स्टेशनवर रेल्वेच्या मुख्य विद्युत पोलवर अडकलेल्या एका माकडाला ट्रेंक्युलाईज अर्थात बंदुकीने इंजेक्शन मारून बेशुद्ध करून बुलडाणा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने सुखरूप वाचवले आहे, विशेष बाब म्हणजे या रेस्क्यूसाठी काही काळ रेल्वे लाईनचा मुख्यविद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता.मुंबई-हावळा ही विद्युत रेल्वे लाईन बुलडाणा जिल्ह्यातून जाते, 2 ऑगस्टच्या दुपारी एक माकड जलंब रेल्वे स्टेशनवरील रेल्वेच्या मुख्य विद्युत पोलवर चढला व या पोलवरील कैंची मध्ये त्याचा पाय अडकलं, बराच वेळ होऊन ही त्याला निघता येत नसल्याचे लक्षात येताच रेल्वे व आरपीएफचे अधिकारी, कर्मचारी या मुळे हैरान झाले होते, याची माहिती खामगाव आरएफओला मिळाल्यानंतर वनविभागाचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले परंतु माकडाला सुखरूप वाचवणे त्यांच्यासाठी जोखमीचे होते, त्यामुळे त्यांनी बुलडाणा वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले… डीएफओ अक्षय गजभिये, एसीएफ रणजित गायकवाड यांच्या आदेशाने रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि माकडाला ट्रेंक्युलाईज केले, बेशुद्ध होतांना माकड या 30 फूटच्या पोलवरून खाली पडल्याने त्याचा जीव जाण्याची शक्यता होती, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलच्या खाली जाळी देखील पकडण्यात आली होती.दोन कर्मचाऱ्यांनी पोलवर चडून बेशुद्ध झालेल्या माकडाला सुरक्षित खाली उतरवले व त्याला शुद्धीवर आणून सुखरूप ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले आहे. या मध्ये बुलडाणा रेस्क्यू टीमचे सदस्य संदीप मडावी,पवन वाघ यांच्या सह वन कर्मचारी गंगा वळवी, दिपक अडपे, भास्कर डाबेराव यांनी कामगिरी बजावली तर रेल्वे व आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केले.
