कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी काढले होते आदेश
बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी व जिवनावश्यक वस्तूंच्या दुकांनामधील गर्दी कमी करण्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील सर्व किराणा, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे व दूध यांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील, त्याठिकाणी गर्दी होवू याबाबत दक्षता घ्यावी तसेच फळांची व भाजीपाल्यांची दुकाने 100 मीटर अंतराने लावण्यात यावीत, दुकानदारांनी ग्राहकांसाठी प्रत्येक दुकानासमोर 1 मीटर अंतरावर ग्राहक उभे राहतील यादृष्टीने नियोजन करावे आणि ग्रामीण भागामध्ये गटविकास अधिकारी व नगरपरिषद क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांनी आदेशाचे तंतोतंत पालन करावे व चुन्याने उभे राहण्याची जागा चिन्हांकित करावी असे आदेश दिनांक 26 मार्च रोजी केले होते.
मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. 26 मार्च रोजी उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेला हा निर्णय व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी घेतलेला वरील निर्णय यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश रद्द केले आहेत व नवीन आदेश प्रस्तावित केले आहेत. नवीन आदेशांन्वये जिल्ह्यातील सर्व किराणा धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे व दूध यांचे दुकाने सुरू ठेवण्याबाबत चा निर्णय रद्द केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा संभ्रम दूर झाला तसेच जिवनावश्यक वस्तूंचे दुकाने आता 24 तास सुरू राहतील.