गाडीला धडकलेल्यांपैकी एक गंभीर: दोन्ही जखमींना घेऊन रविकांत तुपकर औरंगाबादकडे रवाना
बुलडाणा : बेराळा फाट्याजवळ आज रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या इनोव्हा गाडीचा रस्ता क्रॉस करणाऱ्या बाईकसोबत अपघात झाला. या अपघातात बाईक चालविणारा युवक सोळंकी जखमी झाला असून मागे बसलेला तुषार गणेश परिहारला जबर मार लागला आहे. तुपकर यांच्या गाडीचे खूप नुकसान झाले पण ते आणि त्यांचा ड्रायव्हर सुरक्षित आहे. विशेष म्हणजे तुपकरांनी स्वतः या दोन्ही जखमींना तात्काळ चिखली येथे उपचारासाठी आणले आणि तेथून औरंगाबादला पुढील उपचारासाठी घेऊन रवाना झाले आहे. सदर गाड़ी ही तुपकर यांचे स्वीय सहाय्यक सौरभ काळे यांची असल्याची माहिती मिळाली आहे. याच गाडीने ते मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बुधवार, २४ नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीसाठी जात होते. याच दरम्यान चिखली क्रॉस केल्यानंतर त्यांच्या गाडीला अपघात झाला.