शेगांव : माटरगाव शिवारातील शेतात आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास गावातील बंडू सारोळकर हा शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना त्याला एक वाघ आपल्या पिल्लासह दिसल्याने त्या शेतकऱ्याची एकच तारांबळ उडाली होती. बंडू सारोळकर हे पळत गावात आले व गावातील लोकांना यांची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच शेताकडे जाणारे व शेतात राहणारे काही लोक धावत गावांमध्ये परत आले.गावकऱ्यांनी याची माहिती खामगाव येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.वनविभागाची संपूर्ण टीम या शिवारात दाखल झाली होती.
बऱ्याच वेळ शोध घेतला असता तसेच त्याच्या पायाचे ठसे पाहिले असता तो वाघ नसून तडस असल्याचे निष्पन्न झाले. हा वाघ गावातील बंडू सारोळकर यांना आपल्या शेतात दिसला असल्याचे त्यांनी सांगितले. बंडू साळकर हे वाघ पाहून इतके घाबरले की त्यांची तब्येत बिघडली होती.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तो वाघ नसून तडस असल्याचे निष्पन्न केल्यावर बंडू सारोळकर यांनी तो वाघच असल्याचा दावा सुद्धा केला आहे. त्यामुळे वनविभागाची जबाबदारी अजून वाढली आहे. याबाबत सत्यता पडताळण्यासाठी निर्भिड स्वराज्यने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ते ठसे वाघाचे नसून तडस या प्राण्याचे आहे. त्यामुळे माटरगाव शिवारात शेतामध्ये वाघ दिसण्याची अफवाच ठरली आहे.