शेगाव: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनात सहभागी झालेले विष्णू कानडे यांची भेट घेत माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी छोटेखानी सत्कार केला. भारत जोडो यात्रेच्या निमिताने ॲड. यशोमती ठाकूर सध्या बुलढाणा शेगाव येथे असून येथील यात्रा तथा जाहीर सभेच्या पूर्वनियोजनात त्या व्यग्र आहेत. याच दरम्यान ७६च्या आणीबाणी काळातील जेलभरो आंदोलनातील ७८ वर्षाचे विष्णू कानडे यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
भारत जोडो यात्रेच्या निमिताने अवघा देश जोडला जात असताना महाराष्ट्रातील अनेक जुनेजाणते काँग्रेस कार्यकर्ते एकत्र येत आहेत. अशावेळी ७६च्या आणीबाणी काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनात सहभागी झालेले विष्णू कानडे यांची माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आवर्जून भेट घेतली. यावेळी त्यांनी कानडे यांच्याशी आपुलकीचा संवाद साधला. राहुल गांधी यांच्या विषयी त्यांनी प्रश्न विचारताच कानडे यांनी सुद्धा मनमोकळे केले. या आंदोलनादरम्यान ते १८ दिवस जेल मध्ये होते, तसेच त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.