खामगांव : भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष गणेश माने यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. गणेश माने हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु राष्ट्रवादी पक्षांमध्ये जडण-घडण झालेले व मुरलेले गणेश माने यांची भाजपा मध्ये गेल्या काही दिवसांपासून घुसमट होत होती,अशी चर्चा आहे.आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज मुंबई येथे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील व जिल्ह्याचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे. या प्रवेशाने आगामी नगरपालिका निवडणुकीचे चित्र वेगळे पाहायला मिळेल,अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे. गणेश माने मूळ राष्ट्रवादीचे. मात्र २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला होता.परंतू भाजपाची व काही ठरावीक नेत्यांची कार्यशैली त्यांना मानवली नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी परत राष्ट्रवादी पक्षात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या स्वगृही परतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
previous post