संकटसमयी मदतीचा हात दिल्याबदद्ल कामगारांनी मानले सानंदांचे आभार !
खामगांव : कोरोना विषाणू संसर्गामुळे अहमदनगर येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये अडकुन पडलेल्या खामगांव मतदार संघातील ५१ कामगारांना स्वगृही आणण्यासाठी खामगांवचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कामगारांशी सतत संपर्क साधून प्रशासनाशी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्या कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला व अहमदनगर येथुन दुपारी २ वाजताच्या सुमारास निघालेले खामगांवसाठी निघालेले ५१ कामगार दि. १२ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास खामगांवला सुखरुप पोहोचले. खामगांवला पोहोचल्यानंतर कामगार बांधवांच्या चेह-यावर आनंद पहावयास मिळाला याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगांव मतदार संघातील ५१ कामगार हे आपल्या परिवारासह अहमदनगर येथील दरेवाडी मिल्ट्री कॅम्प,एमआयडीसी गेट नंबर ३ परिसरात लाॅकडाऊन सुरु झाल्यामुळे तब्बल ४७ दिवसापासुन अडकून पडले होते.
कामगारांच्या जवळची सर्वच संसाधने संपल्यानंतर ‘आम्हाला घरी पोहोचवा’ अशी आर्त हाक मजुरांकडून केली जात होती. परंतू कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. या घटनेची माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना माहिती मिळताच सानंदा यांनी त्या कामगारांपैकी प्रकाश सुखदेव तायडे रा.शंकर नगर, खामगांव व सिध्दार्थ इंगळे रा.गारडगांव या कामगारांशी भ्रमणध्वनीद्वारे सतत संपर्क साधून ते नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे. याची माहिती जाणुन घेतली. तद्नंतर प्रशासनाशी संपर्क साधून अहमदनगरचे तहसिलदार उमेश पाटील यांना कामगारांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर तहसिलदार उमेश पाटील यांनी तपशीलवार माहिती घेवून बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाहरकत मागविली व तसेच माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना कळविले. तद्नंतर लगेचच सानंदा यांनी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत मॅडम यांचेशी संपर्क साधून त्यांना नाहरकत देण्यासंबंधी कळविले.जिल्हा प्रशासनाकडून अहमनगर येथील तहसिलदार उमेश पाटील यांचेशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या विशेष परवानगीने या मजुरांचा घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला.बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातून कामगारांच्या प्रवासासाठी नाहरकत मिळाल्यानंतर प्रवासासाठी लागणा-या सर्व प्रक्रिया पुर्ण झाली.
अहमदनगर येथुन त्या सर्व ५१ कामगारांना खामगांव येथे आणण्यासाठीचा लागणारा संपुर्ण खर्च माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उचलला व त्यासाठी लागणारा ५५ हजार रुपयांचा भरणा आॅनलाईन पध्दतीने करण्यात आला. त्यानंतर मंगळवार दि.१२ मे रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास श्री बालाजी ट्रॅव्हल्स यांच्या ३ खाजगी बसेसद्वारे हे सर्व ५१ कामगार खामगांवच्या दिशेने रवाना झाले.अहमदनगर येथुन निघालेले ५१ कामगार १२ मे रोजी रात्री ९ वाजता खामगांव पोहोचले. यामध्ये २६ पुरुष, १६ महिला आणि ५ बालकांचा समावेश आहे. याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सर्व कामगारांची भेट घेउन आस्थेने विचारपूस केली. सर्व ५१ कामगारांची खामगांव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली व तद्नंतर या सर्व कामगारांना स्वगृही सोडण्यात आले. खामगांव येथे पोहोचल्यानंतर अनेक कामगारांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्याबदद्ल उपकाराची भावना व्यक्त केली आम्ही प्रत्येकजण त्यांचे खुप-खुप आभारी आहोत असे त्यांनी सांगितले. याबाबत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, खामगांव मतदार संघातील कुठलाही नागरिक जर संकटात असेल तर नुसता शब्द न देता प्रत्यक्ष मदतीला धावून जाण्यासाठी मी सदैव तत्पर राहील.