बुलडाणा : महिला व बालविकासच्या संदर्भातील सर्व योजना, उपक्रम यांची माहिती देण्यासाठी व सर्व कार्यालयाच्या एकत्रित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बालविकास भवन अस्तित्वात येणार आहे. या भवनच्या कक्षाचे उद्घाटन जिल्हा परीषदेमधील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हाधिकारी षण्मुखराजन,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रामरामे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, महिला व बालविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या महिला व बालविकास कक्षाच्या माध्यमातून करण्यात यावी. नविन महिला व बालविकास भवनसाठी जागा बघून प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या जागांचा शोध घ्यावा. विभागातंर्गत असणारे कार्यालय, विभाग व योजनांचा पसारा मोठा आहे. त्यामुळे स्वतंत्र भवन आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रामरामे यांनी कक्षाविषयी माहिती दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, महिला आयोगाचे कार्य व योजना, एकात्मिक बालविकास प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आदींविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथील सरपंचा श्रीमती कदम यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हाधिकारी षण्मुखराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.