खामगाव: महावितरण कंपनीने शहरात ठिक ठिकाणी विद्युत रोहित्र (डिपी) सताड उघडे ठेवले आहे. या जीवघेणे डिपी म्हणजे त्यांनी शहरात उघडपणे पेरून ठेवलेले बॉम्बच असून कोणत्याही क्षणी आणि कोणताही जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या डिपी वीज कर्मचाऱ्यांसह नागरिकांना बाराही महिने घाम फोडत आहेत.तर शहर एक मोठ्या धोक्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे.महावितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी डीपी बसविण्यात आले आहेत.खामगाव शहरातील जुने बस स्टँड जवळ,पेट्रोल पंप,घाटपुरी रोड, सातव चौक अशाच डीपी लावण्यात आल्या आहेत.या ठिकाणी गॅस एजन्सी,हॉटेल,मर्शियल कॉम्प्लेक्स,पेट्रोल पंप,ऑटोरिक्षा स्टॉप,नागरिक वस्ती असल्याने नेहमी या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते.या डीपीला महावितरण कंपनीने एक फाटक लावलेले आहे तर दुसरे फाटक लावलेले नाही तर काही ठिकाणी तर चक्क फाटक असून सुद्धा लावलेले नाही.त्यामुळे तेथील फ्यूज नागरिकांना नेहमीच अपघाताचे संकेत देत असतात.अनेकदा तर अति उच्चदाब किंवा एखादा फॉल्ट झाला तर मोठा भडका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे मोठा आगीचा गोळा अनेकदा या डिपीतून बाहेर पडतो आणि कानठळ्या बसवणारा आवाज येतो.यामुळे नागरिक किंवा रेस्ट हाऊसमध्ये येणारे प्रतिष्ठित आणि परिसरातील रहिवाशांच्या पोटात धस्स होत असते.यामुळे येथील नागरिक हे जीव मुठीत धरून जगत आहेत.पण याकडे कोणत्याही जबाबदार वीज अभियंता व अधिकाऱ्यांचे लक्ष कसे जात नाही? असा संतापजनक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे.वायरमन च्या जीवाला धोका निर्माण होतांना दिसून येत आहे.एखादा फॉल्ट झाल्यास महावितरणकडून वायरमनला त्वरित पाठवले जाते.तेही आपल्या जीवाची बाजी लावत या उघड्या डीपीचा फ्यूज टाकणे किंवा किरकोळ काम करून वीजपुरवठा सुरू करीत असतात.दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास त्याचेही कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या डिपींची व्यवस्थित सुरक्षितता ठेवली तर त्यांचेही काम सोपे होईल आणि परिसरातील धोका ही टळू शकतो.त्यामुळे याकडे कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.