बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीफ हंगामातील मुंग, उडीद, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रूपये मदत करावी व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी शँडो कँबिनेट मंत्री विठ्ठल लोखंडकार यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी डोळ्यांना काळ्या पट्या बांधून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये नमुद आहे की, गेल्या कित्येक दिवसापासून संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यात पावसाने अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरिफ हंगामातील तोडाशी आलेले उडीद, मुग, सोयाबीन, कपाशी मका व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यापुर्वी सुध्दा आम्ही शासनाकडे केली होती मात्र शासनाने अद्यापही मदत जाहीर केलेली नाही.
मागील दोन – चार वर्षांपासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने पिकाचे उत्पादन घटले. अशातच बोगस बियाणे मुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त होता. मागील सहा महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतमालाला बाजारभाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. या हंगामात पीक चांगले आले होते. परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे भयानक नुकसान झाले. या चोहुबजूने आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रूपये मदत करावी व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, आनंद गायगोळ, मनोज पवार, बाळराजे देशमुख, बंटी नाईक, लक्ष्मण जाधव, शैलेश कापसे, अशोक पाटील, विनोद टिकार, दिपक राठोड, भागवत उगले, विनोद खरपास, राजू मांटे, निलेश देवरे, सागर बावस्कर, आकाश पाटील, प्रतिक लोखंडकार, ओम वतपाळ, शिवचरण खोंड, घनशाम केळकर, श्रीकृष्ण अंभोरे, लक्ष्मण जाधाव, राधेशाम बंगाळे पाटील यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.