सर्वसामान्यांच्या ‘लालपरी’ चा आज वाढदिवस
महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटीने आज 72 वर्ष पूर्ण केले आहेत. तुमच्या आमच्या सुख -दुःखाला धावून येणाऱ्या एसटीचा वाढदिवस यंदा कोरोनामुळे साजरा होणार नसल्यानं याबाबतची खंत एसटी कर्मचारी, प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.
तिला कुणी एसटी म्हणतं… कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं… कुणाला ती प्राणाहून प्रिय आहे तर कुणी तिचा तिरस्कारही करतं मात्र ती महाराष्ट्राची जीवन वाहिनी आहे हे कुणीही नाकारु शकत नाही. आज महाराष्ट्राच्या शहरी भाग ते ग्रामीण भाग तसेच महानगर पर्यंत जाऊन लोकांची ने आण करण्याचं काम एसटी करते. शहरी भाग, तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात आजही लोक एसटी वाट पाहत थांबलेल दिसतात कारण वाहतुकीसाठी त्यांना विश्वासाचा आधार आहे फक्त एसटीचाच…एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास… असा नारा सरकारने दिला किंबहुना तिला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलं मात्र आपल्याला तिचा खरा इतिहास माहीत आहे का? महाराष्ट्रातील पहिली एसटी केव्हा सुरु झाली? ती कोणत्या दोन शहरांमध्ये धावली ? तेव्हा एसटीचं तिकीट नेमकं किती रुपये होतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पडला असेल किंवा नसेल पडला तरी आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलो आहोत.
1 जून 1948 रोजी पहिल्यांदा धावली एसटी
महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता 1 जून 1948. आत्ता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नाव असलं तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होतं. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं एसटी महामंडळाचं नाव होतं. एसटी बस कुठल्या दोन शहरांमध्ये धावणार याची जशी तुम्हाला उत्सुकता होती तशी उत्सुकता त्यावेळच्या लोकांमध्येही होती. अहमदनगर आणि पुणे ही ती दोन भाग्यवान शहरं होती. ज्यांच्या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती. पहिली एसटी बस म्हणजे तिचा थाट विचारायला हवा का? किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता, तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ वाहक होते.
कशी होती पहिली एसटी बस ?
जी बस पहिली एसटी बस म्हणून धावली तिची बॉडी (रचना) आजच्या सारखी लोखंडी नव्हती किंवा आतमध्ये अॅल्युमिनिअमचं कामही नव्हतं. ती एक लाकडी बॉडी होती आणि वरुन जे छप्पर होतं ते चक्क कापडी होतं. लाकडी बॉडी असलेल्या या बसची आसन क्षमता 30 होती. सकाळी ठिक 8 वाजता ही बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसचं तिकीट होतं अडीच रुपये.
ठिकठिकाणी झाले जल्लोषात स्वागत
अहमदनगर ते पुणे प्रवासाच्या दरम्यान चास, सुपा, शिरुर, लोणीकंद अशी गावं लागली. लोक एसटी बस थांबवून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र आसन क्षमतेमुळे ते शक्य नव्हतं. ज्या गावांमधून पहिली एसटी जाणार होती त्या गावांमध्ये आजूबाजूच्या गावांमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनं तशी अभावानंच पहायला मिळणाऱ्या या दिवसांमध्ये लोकांना या गाडीचं अप्रूप वाटणं सहाजिक होतं. गावागावांमध्ये लोक बसचं जल्लोषात स्वागत करत. नवीन वाहनं आणल्यावर आज आपल्याकडे सवासिनी त्याची पुजा करतात किंवा आजही एखाद्या गावात एसटीची सेवा सुरु झाली तरी अशी पुजा केली जाते. तेव्हाही गावागावांमध्ये सवासिनी पुजेचं ताट घेऊन उभ्या होत्या. एसटी गावात पोहोचली की तिची पुजा केली जाई.
पोलीस बंदोबस्तात धावली पहिली एसटी बस
पुण्यामध्ये शिवाजीनगर जवळच्या कॉर्पोरेशन जवळ या बसचा शेवटचा थांबा होता. मात्र त्यावेळी पुण्यात अवैध वाहतूक जोरात होती. राज्य महामंडळाची बस सुरु झाल्यानं या अवैध वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे एसटीवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एसटीवर हल्ला होण्याची शक्यता राज्य सरकारने गांभीर्याने घेतली होती. त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून म्हणजेच माळीवाडा वेशीपासून ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली.
1 जून 2020 या दिवशी या घटनेला 72 वर्षे पूर्ण होतील. आजही त्याच निश्चयाने एसटी लोकांना गावोगावी पोहोचवण्याचं काम करत आहे. आता तर अत्यंत आकर्षक शिवशाही, शिवशाही स्लीपर कोच, शिवनेरी, अश्वमेघ, विठाई, विना वातानुकूलित शयनयान अशा नव्या रुपात आरामदायक प्रवासाचा आनंद देत आहे. या 72 वर्षात अनेक उन्हाळे , पावसाळे एसटीनं अनुभवले त्याचा तितक्याच हिंमतीने आपल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संघर्ष देखील केला. ज्या प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी विविध सवलती दिल्या जातात त्याच प्रमाणे आता एसटी देखील ज्येष्ठ नागरिक झाल्याने एसटीला सरकारनं विविध सवलत द्यायला हवी, जसे की प्रवाशी कर,इंधन कर,टोल टॅक्स यातून एसटीला सवलत दिल्यास एसटीला आणखी भरभराटीचे दिवस येतील यात शंका नाही .
सध्या कोरोना या महामारीनं सर्वच क्षेत्रावर परिणाम झालेला आहे . मात्र या महामारीच्या काळात देखील एसटी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धावली . परप्रातीयांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी धावली . इतकंच नाही तर कोरोनाच्या या महामारीच्या वातावरणात ज्येष्ठ झालेली एसटी आता प्रवाशी वाहतुकीबरोबरच स्वतःच्या अंगावर मालवाहतुकीचं ओझं सहन करून इच्छित स्थळी पोहचवणार आहे .
शेतकरी ,व्यापारी ,उद्योजक,लघु उद्योजक यांना माफक दरात ही मालवाहतूक सेवा एसटी देणार आहे . साहजिकच एसटीची सेवा ही विश्वासार्ह असल्यानं अल्पावधीत एसटीच्या या मालवाहतूक सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे . एसटी महामंडळाचे राज्यात 250 आगार आहेत. 31 विभागीय कार्यालयं, 33 विभागीय कार्यशाळा असा मोठा विस्तार आहे . एका आगाराला साधारण 11 मालवाहू एसटी ट्रक असे साधारण अडीचशे ते तीनशे एसटी ट्रक लवकरच उपलब्ध करून देण्याचा एसटी प्रशासनाचा मानस आहे .
एसटी मालवाहू ट्रक हा उपक्रम जरी नवा असला तरी काही सेवा निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या मते अशा एसटी ट्रक एसटीचे विविध स्पार्ट्स ,साहित्य ,टायर यांची ने -आण करण्यासाठी एसटीच्या विविध विभागात आज ही कार्यरत आहे फरक फक्त एवढाच आहे की,ही सेवा फक्त एसटी विभागापुरती मर्यादित आहे .मात्र आता सर्व प्रकारच्या माल वाहतूकीसाठी एसटीची ट्रक सेवा ही शेतकरी, व्यापारी ,उद्योजक ,लघु उद्योजक, यांच्यासाठी माफक दरात उत्तम सेवा आहे.एसटीच्या या मालवाहतुकीसाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष निर्माण केलेत . एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी एसटीची मालवाहू सेवा नक्कीच संजीवनी ठरेल असा विश्वास एसटी प्रशासनाला आहे .
स्पर्धेच्या या युगात ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली, तुमच्या -आमच्या सुख -दुःखाला धावून येणाऱ्या या एसटीला संजीवनी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष भेद विसरून यासाठी प्रयत्न करायला हवेत ग्रामीण भागातील जनतेच्या सुख दुःखाला धावून जाणाऱ्या या एसटी ला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.