खामगांव : लाच म्हणून दारू व मटणाची पार्टी मागणाऱ्या लाखनवाड़ा येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भावाच्या नावे घेतलेल्या प्लॉटची सातबाऱ्यावर नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपये तसेच दारू व मटनाची पार्टीची मागणी लाखनवाड़ा येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांना केली होती. खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने त्याच्या भावाच्या नावाने प्लॉट घेतला होता. त्याची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर आणि तलाठी बाबुराव उखर्डा मोरे यांनी दहा हजार रुपये दारू व मटणाची पार्टी मागितली होती. यातील दहा हजार रुपये यापूर्वी या दोघांनाही देण्यात आले होते, मात्र मटनाच्या पार्टीसाठी त्यांचा जोर तक्रारकरत्या कडे सुरू होता. या प्रकरणी त्रस्त झालेल्या तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडळ अधिकारी व तलाठी अटक केली आहे. विशेष म्हणजे २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान खामगाव तालुक्यातील पिंपरी धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडीसमोर दारु व मटणाच्या पार्टी सुरू असतानाच लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी व त्यांचे सहकारी पोहोचले व त्यांनी दोन्ही आरोपींना पार्टी करताना ताब्यात घेतले. सोबत दारूच्या दोन बाटल्या ही त्यांनी जप्त केल्या आहे. या कारवाई दरम्यान आरोपी ज्या खाद्यपदार्थवर ताव मारत होते, ते खाद्यपदार्थ पंचासमक्ष लाचलूचपत विभागाने तेथेच नष्ट केले होते. सदर पार्टी मध्ये तहसील मधील एक बडा अधिकारी व एक कर्मचारी असल्याची चर्चा तहसीलमध्ये सुरू आहे. मात्र त्यामध्ये त्या दोघांनाही सोडून देण्यात आल्याची अशी चर्चा खामगांव परिसरात रंगू लागली आहे. या दोन्ही आरोपींना लाचलुचपत विभागाचे अधिकारी येथील विश्रामगृहावर पुढील कारवाई करण्यासाठी घेऊन गेले असता त्या ठिकाणी तहसील मध्ये दलाली करणारे दोन-तीन दलाल ठाण मांडून बसले होते व काही दलाल तेथे चकरा मारत होते. यामुळे या प्रकरणात अजून काही गौडबंगाल असण्याची शक्यता असल्याची चर्चा नागरिक खाजगीत करतांना दिसून येत आहे.