भोपाळ प्रयेगशाळेचा अहवाल पॉझीटीव्ह
घाबरुन न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा : जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भानखेड येथील जनार्धन सत्तू इंगळे यांचेकडील कुक्कुट पक्षांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू रोगाने झाला आहे. तेव्हा या रोगाचा प्रसार चिखली तालुका व इतर ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून भानखेड येथील बाधीत कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने कलींग करून विल्हेवाट लावण्यात येत आहे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी भानखेड येथील जनार्धन सत्तू इंगळे यांच्या घराशेजारील बॉकयार्ड पोल्ट्री या संसर्ग केंद्रापासून 1 किलोमीटर परीसर हा बाधीत क्षेत्र व 1 ते 10 किलोमीटरचा परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. बाधीत क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांची, निगडीत खाद्य व अंडी यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश जलद कृती दलास देण्यात येत आहे. तसेच 1 ते 10 कि.मी त्रिज्येतील निगराणी क्षेत्रातील कुक्कुट पक्षी, खाद्य व अंडी यांचे निगराणी क्षेत्रा बाहेर वाहतुकीस 21 दिवस पर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.