नांदुरा : सध्या कोरोना या आजाराने देशभरात थैमान घातले आहे. या आजरावर आतापर्यंत कुठलेही औषध व उपचार उपलब्ध नाही आहेत. या संसर्गजन्य आजारापासून जर आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे लागेल. शक्यतोवर अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तु मिळतात त्या ठिकाणी नागरिकांची ये-जा असणारच आहे, त्यामध्ये भाजीपाला मंडितील गर्दीपासून नांदुरा शहरातील नागरिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने भवानी ग्रुप जनसेवी परिवाराचे सौरभबाप्पु मुकुंद यांच्या कल्पनेतून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अत्यंत अल्पदरात शेतकरी बांधव ते ग्राहक असा अभिनव सुरक्षित जनउपयोगी उपक्रम सुरू झाला आहे. यामध्ये भवानी ग्रुपचे सदस्य तसेच युवा शेतकरी वैभव बावस्कर व इतर ग्रुपचे सदस्य हे स्वतःची सुरक्षिता बाळगून नांदुरा शहरातील नागरिकांना घरपोच सेवा देत आहेत. या सामाजिक उपक्रमामुळे नांदुरा शहरातील नागरिकांना धावपळ न करता, घराबाहेर न निघता सुरक्षितरित्या भाजीपाला हा थेट आपल्या घरापर्यंत मिळत आहे. त्यामुळे नांदुरा शहरातील नागरिकांची या सेवेमुळे चांगली व सुरक्षित सोय भवानी ग्रुप जनसेवी परिवाराच्या सदस्यांच्या वतीने होत आहेत. तसेच शेतकरी बांधवांना या उपक्रमामुळे आपल्या शेतमालाला उत्पादनखर्च थोड्याफार प्रमाणात निघत आहे यामुळे त्यांना सध्या तरी आधार मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभरातून हा उपक्रम नांदुरा शहरात सध्या गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधत सुरू करण्यात आला आहे. नांदूरा येथील या उपक्रमाची दखल महाराष्ट्रातील इतर शहराच्या ठिकाणी असलेल्या सामाजिक संस्था, संघटनांनी सुद्धा अनुकरण करावे असे आवाहन भवानी ग्रुप जनसेवी परिवारातर्फे केल्या जात आहे अशी माहिती सौरभबाप्पू मुकुंद यांनी निर्भीड स्वराज्य ला दिली.