खामगाव :माटरगाव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत जि प प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा येथे रोप संगोपनासाठी “एक मूल एक झाड” हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. देशी वृक्षलागवड वाढावी आणि विद्यार्थ्याना एक अनोखा अध्ययन अनुभव मिळावा यासाठी शाळेने १ मे २०२२ रोजी शाळेतील वर्ग १ ते ४ च्या ३५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ पिशवी मातीसह रोप लागवडीसाठी दिली.त्यामधे विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या आंबा, चिंच, जांभूळ, बदाम, नारळ, बेल, वड, पिंपळ, निंब इत्यादी वृक्षांच्या बी चे रोपण करून त्याचे संगोपन करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यानी आवडीने, स्वयंप्रेरणेनी रोप संगोपनाची जबाबदारी स्विकारली. बीजारोपण कसे करतात ? बीजांकुरण कसे होते ? रोपाची वाढ कशी होते ? रोपाची काळजी व संगोपन कसे करतात ? ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कृतीतुन, अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकता आली . दररोज आठवणीने रोपांना पाणी घालता -घालता त्या रोपाशी मुलांचा लळा लागला आहे. पावसाळ्यात या रोपासमवेत वृक्षदिंडी काढून या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानपत्र देऊन त्यांचा पर्यावरण स्नेही पुरस्काराने शाळा व्यवस्थापन समिती गौरव करणार आहे.”एक मूल एक झाड” या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षमित्र श्री दिगंबर काकड सर शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंद गायकी व कु. स्वाती पवार मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयीची गोडी निर्माण करणारा ,जिल्ह्याभरातील सर्व शाळांसाठी प्रेरणादायी ठरणारा असा हा उपक्रम ठरला आहे. सदर उपक्रमाचे पालक वर्गातुनही कौतुक होत आहे.