बोरी अडगाव येथील घटना
खामगाव : बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या बोरी अडगाव येथील २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बोरी येथील माजी सरपंच निरंजन सुरवाडे यांचा मोठा मुलगा आशुतोष निरंजन सुरवाडे वय २२ हा उद्या पोळा सण असल्याने सकाळी बैल धुण्यासाठी गावाशेजारील कारेगाव शिवारातील तलावामध्ये मित्रांसोबत गेला होता. दरम्यान तलावामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब सोबत असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आशुतोष यास तातडीने बाहेर काढले. मृतक आशुतोष याचे बी.ए. पदवी पर्यंत शिक्षण झाले होते. आशुतोष याच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ आहे. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून मूळगावी बोरी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.