बुलडाणा : शिवसेनेची बुलंद तोफ, बुलढाणा मतदार संघाचे माजी आमदार, शिवसेनेचे जेष्ठ नेते विजयराज शिंदे यांनी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे सागर या निवासस्थानी भाजप मधे प्रवेश घेतला.
शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे एक तडजोड म्हणून त्यांनी वंचित चा झेंडा हाती घेतला होता,मात्र वंचितमधे त्यांचे मन लागत नसल्याने त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. विजयराज शिंदे यांना तीन निवडणुका लढण्याचा तगडा अनुभव असून त्यांनी 1995, 2004,2009 या निवडणुकांमध्ये प्रचंड मतांनी विजय प्राप्त केला होता. मात्र मतदार संघातील काही पक्षांतर्गत कुरघोडी मुळे त्यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. राजकीय खेळी करण्यात चाणाक्ष असलेल्या विजयराज शिंदे यांना आगामी काळात मतदारसंघाची पुनर्बांधणी करून पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे.त्यांच्या या प्रवेशावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ.संजय कुटे, आ.अॅड.आकाश फुंडकर, चिखली मतदार संघाच्या आ.सौ.श्वेताताई महाले, बुलढाणा भाजपा चे योगेंद्र गोडे उपस्थित होते.