२ देशी कट्टे, शस्त्रासाठ्यासह नकली नाणी जप्त
३१ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त
२५ आरोपी अटक; बुलडाणा पोलिसांची मोठी कारवाई
खामगांव : आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या एका टोळीचा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी आज सकाळी पर्दाफाश केला. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार १५ लाखाच्या फसवणूक प्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर गुरूवारी पहाटे ५ वा सुमारास खामगाव अपर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने अंत्रज गावाजवळील पारधी वस्तीवर कोंबीग आँपरेशन राबविले. यात दोन देशी कट्ट्यांसह, शस्त्रात्र आणि नकली सोन्याची नाणी असे ३१ लाख ७९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची नकली नाणी देऊन गंडविणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या पथकाला मिळाली. या संघटीत टोळीद्वारे राज्यातील अनेकांना गंडविण्यात आले. कमी किंमतीत नकली सोन्याची नाणी देण्याचा सौदा ठरवायचा. सौदा ठरल्यानंतर संबंधितांना अंत्रज शिवारात बोलवायचे आणि ग्राहकाकडील रक्कम आणि ऐवज लुटायचा अशी सवय असलेल्या टोळीने ५ मे रोजी पुणे येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक करून मारहाण केली व १५ लाख रुपये घेऊन पोबारा केला होता.
याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे आणि माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी खामगाव उपविभागीय पोलिस अधिकार क्षेत्रातील पोलीस निरिक्षक, सहा.निरिक्षक, पोलीस नायक आणि पोलिसांच्या मदतीने गुरूवारी पहाटे चिखली रोडवरील अंत्रज फाट्यावर असलेल्या पारधी वस्ती येथे कोंबींग आँपरेशन राबविले. या धडक कारवाईत टोळीतील २५ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन देशी कट्टे, सोन्या चांदीचे दागिने, नकली सोन्याच्या गिन्या, रोख रक्कम २६ लाख रुपये, २६ मोबाईल, तलवारी, सुरे भाले, कुर्हाड असा मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकराच्या अनेक गुन्ह्याचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी खामगावला भेट देत पोलिसांचे अभिनंदन केले या कारवाईत शहर पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, शिवाजी नगरचे पोलीस निरिक्षक सुनिल हुड, शेगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संतोष ताले, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकुळ सुर्यवंशी, गौरव सराग यांच्यासह १५० पोलिस कर्मचारी व पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे अंत्रज या गावाला गुरूवारी सकाळी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.