April 19, 2025
जिल्हा बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यात होणार एकूण २०९२५ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप

दि ७ एप्रिल २०२० पासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध

बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ५ एप्रिल २०२० या पाच दिवसात बुलडाणा जिल्ह्यातील १०६६२९ शिधापत्रिका धारकांना तब्बल २६१७० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा यांनी दिली आहे.तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. ​
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १८.५ लाख आहेत.या लाभार्थ्यांना १५३६ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड २० किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड १५ किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.
बुलडाणा जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे १५५५५ क्विंटल गहू, १०६१५ क्विंटल तांदूळ, तर १३६ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे ४२७९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ दि.०७ एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सदर योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त करून घेतले जाणार आहे. दि.०७ एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे .हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे यांनी दिली आहे.


सौजन्य – DIOBULDANA

Related posts

माझ भाग्य़ आहे की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करुन माझा वाढदिवस साजरा करीत आहे – ॲड.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

जलदिनानिमित्त चिखली बु येथे कलश यात्रा

nirbhid swarajya

कोरोनावर मात केलेल्या ९ रुग्णांना देण्यात आली सुट्टी..

nirbhid swarajya
error: Content is protected !!