खामगांव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना आता घरोघरी ऑक्सीमीटर दिसू लागले आहेत. एका हाताच्या पाचही बोटांना वेगवेगळे ऑक्सीमीटर लावल्यावर वेगवेगळे आकडे दिसत असल्याचे फोटो आणि काही माहिती सोबतच व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे नेमका कशा प्रकारचा मीटरचा वापर करावा याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी ऑक्सीमीटरचा उपयोग होतो. कोरोना बाधित रुग्णांमध्ये फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावते.या ऑक्सीमीटर मध्ये बोट ठेवल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजली जाते. त्याचप्रमाणे आपल्या हृदयाचे ठोके देखील या ऑक्सीमीटरद्वारे मोजल्या जातात.
कोरना बाधित रुग्णांना दर दोन तासांनी ऑक्सिजनची मात्रा तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 90 टक्क्यांहून जास्त असले पाहिजे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे की मात्रा 90 पेक्षा खाली असल्यास तात्काळ त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा केले आहे. ऑक्सीमीटर मधील सेन्सर हे शरीरातील तापमानावर काम करते त्यामुळे येणारे परिणामी त्यांच्या तापमानावर अवलंबून असतात.सध्या बाजारात विविध कंपनीचे ऑक्सीमीटर उपलब्ध आहेत, त्यांची किंमत 400 रुपयांपासून 2 हजार रुपयापर्यंत आहे. त्यामुळे कोणत्याही ऑक्सीमीटर कंपनीचा ब्रँड आणि उत्पादनाची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक आहे.सध्या बाजारात चीन वरून आयात केलेले ऑक्सीमीटर मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत.