आतापर्यंत २० रूग्णांना मिळाली सुटी
बुलडाणा : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत २४ रूग्ण बाधीत केले. कोरोना फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण कोरोना निवळण्यासाठी तयार झाले आहे. आज ४ मे २०२० रोजी चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.
जिल्ह्यात चिखली येथे ३, चितोडा ता. खामगांव येथे २, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे २, सिंदखेडराजा येथे १, मलकापूर येथे ४ आणि बुलडाणा येथे ९ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते.त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील ५, शेगांव येथील ३, चितोडा ता. खामगांव येथील २, चिखली येथील २, मलकापूर येथील ४, दे.राजा येथील २ आणि सिंदखेडराजा येथील एका कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज एका रूग्णाची भर पडली आहे. आज चिखली येथील एक रूग्ण बरा होवून स्वगृही परतला आहे. अशाप्रकारे एकूण २४ पैकी १ रुग्णाचा आधीच मृत्यू झालेला असून २० रूग्ण बरे झालेले आहेत. आता केवळ ३ रुग्ण कोरोना बाधित असून उपचार घेत आहे आणि उपचाराला त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच उर्वरित रुग्ण देखील बरे होऊन बुलडाणा जिल्ह्याची वाटचाल ही पूर्णतः कोरोना मुक्तीकडे होऊ शकते.
सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.