खामगाव : महाराष्ट्रातील शोषित, वंचित घटकांचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना.बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बच्चु कडू यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले, यशस्वी कृषी उद्योजक तथा कृषी तज्ञ अंकुश मधुकर खाडे यांनी अवयव दानाचा संकल्प केला आहे. तसे लेखी संमती पत्र त्यांनी येथील सामान्य रूग्णालयात दिले आहे.

माणूस मेल्यावरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयव दान आहे. एक सुदृढ माणूस मेला तर तो जाता जाता १० माणसांना जीवनदान देवून जातो, हे जगातील एक आश्चर्य आहे. त्यामुळे मरावे परि किर्तीरूपी उरावे या समर्थांच्या उक्तीनुसार अवयवदानाची चळवळ प्रेरणा देवून जाते. आपल्या नेत्याचा वाढदिवस हा संकल्पदिवस व्हावा आणि खऱ्या अर्थांने अनेकांना नवा जन्म देणारा जन्मदिवस व्हावा या विचाराने भारावलेल्या नामदार बच्चु कडू यांचा सच्चा कार्यकर्ता व ध्येयवेड्या अंकुश मधुकर खाडे यांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.

त्यांनी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात जावून नेत्र विभाग, व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती विभागात जावून नेत्रदान व अवयव दान करण्याचा संकल्प केला. तसे संमती पत्र निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे यांच्याकडे सोपविले आहे. यावेळी त्यांच्यासोबत रेणुका फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन लोखंडकार, पत्रकार मोहन हिवाळे, किरण मोरे आदी उपस्थित होते.