शेगांव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्यानं सर्वच उपायांवर पाणी फेरलं जात आहे. अनेक बाजारपेठांमध्ये गर्दीचा ओघ सुरूच आहे. त्यातून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक ठिकाणी तर इच्छा असूनही नागरिकांना अंतर राखणं कठीण जात आहे. परिणामी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.यावर उपाय म्हणून शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी शारीरिक अंतर राखावे याकरीता गावामधून छत्री मार्च काढण्यात आला. यामधून आपण छत्री वापरून सहज शारीरिक अंतर राखू शकतो शिवाय छत्रीचा वापर केल्यास उन्हापासून रक्षण सुध्दा होते असा संदेश देण्यात आला. या छत्री मार्च मध्ये गावातील आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस बचत गटाचे अध्यक्ष, सचिव व ग्रा प सदस्य, ग्रा प कर्मचारी व गावातील जेष्ठ नागरीक आदी हजर होते.
previous post