खामगाव:-प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,२२ मार्च रोजी सकाळी ७ वाजता नांदुरा तालुक्यातील गोसींग शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.शेख अल्ताफ शेख शकील(२२, रा गोसिंग) आणि वैशाली गंगाराम तिळे (१७, रा तरोडा नाथ,ता मोताळा) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोसिंग येथील शेख अल्ताफ हा काल,२१ मार्च रोजी संध्याकाळी शेतात गेला होता .बकऱ्या साठी चारा आणतो असे सांगून तो मोटरसायकल घेऊन शेतात गेला.मात्र रात्री बराच वेळ होऊन तो घरी परतला नाही.त्याची मोटारसायकल शेतात बांधावर उभी होती.याप्रकरणी काल रात्री उशिरा अल्ताफ च्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.दरम्यान नातेवाईक त्याचा शोध घेत होते.मात्र अल्ताफ कुठेही दिसून आला नाही, आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास गोसिंग शिवारातील वेरुळेकर यांच्या विहिरीच्या काठावर दोन मोबाईल व अल्ताफ चा चष्मा दिसून आला.घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांच्या मदतीने विहिरीत खाट सोडून मृतदेह काढत असताना अल्ताफ सोबत आणखी एका मुलीचा मृतदेह सापडला.मुलगी मोताळा तालुक्यातील तरोडा नाथ येथील वैशाली गंगाराम तिळे असल्याचे समोर आले.दरम्यान दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले.मात्र असे असले तरी पोलीस वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहत आहेत.दोघांचे मृतदेह बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.तपास बोराखेडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करीत आहेत.मुलीचे वडील मेंढ्या घेऊन जालना जिल्ह्यात गेले होते..मुलगी गावात तिच्या आजीसोबत रहात होती..अल्ताफ चे नेहमी तिच्या घरी जाणे येणे असायचे.. काल दुपारपासून मुलगी बेपत्ता होती..मुलीच्या आजीने तिच्या वडिलांना याबाबतीत माहिती दिल्याने मुलीचे वडील रात्रीच गावात दाखल झाले..आज सकाळी ते पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहचले..तक्रारीवरून पोलिसांनी अल्ताफ विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला..आणि त्याच वेळी दोघांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरू आहे या आत्महत्येने जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.