खामगाव : प्रेमी युगलाने नदिमधे उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. यामध्ये युवक हा खामगावातील असून युवती ही लोणार येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार खामगांव येथील सुटाळा बु. येथील शिवाजी नगरातील अक्षय अशोक घरत वय 20 व लोणार तालुक्यातील दाभा येथील कोमल राजु बाजड वय 17 या दोघांनी महेश नदीच्या पुलावरुन नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. राष्ट्रीय महमार्गावरुन ये-जा करणाऱ्याना त्या दोघांचे मृतदेह नदीत तरंगताना काय सायंकाळी आढळले. अक्षय हा गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने नातेवाइकांकडून सर्वत्र त्याचा शोध घेण्यात आला होता मात्र तो कुठेही मिळून आला नाही. अक्षय त्याचा आई सोबत एकटाच राहत होता व आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, यापूर्वी त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. तर कोमल ही अकोला येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रेमी युगुलाच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी अकोला येथील रुग्णालयात पाठविले असून पोलिसांनी त्या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. युवकाच्या खिशात चिठ्ठी सुद्धा आढळून आली असल्याची माहिती आहे व पुढील तपास बाळापुर पोलीस करत आहे.