ग्रामपंचायत कडून वर-वधू ना पाच हजार धनादेश
खामगाव : कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात लग्न तसेच इतर सण, धार्मिक सोहळे आदींवर गर्दी होत असल्यामुळे बंधने घालून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना या काळात तारखा बदलून घ्याव्या लागत आहे तर काहींनी शासनाच्या नियमांचे पालन करत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळे आटोपले. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता या काळामध्ये रजिस्टर मॅरेज उत्तम पर्याय ठरला असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील हा आदर्श विवाह बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पार पडले आहे. या विवाहाचे प्रशासनाकडूनही स्वागत होत आहे.कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात अनेकांचे नुकसान झाले तसे नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर मॅरेज) करणाऱ्यांचे देखील झाले.मात्र आता रजिस्टर मॅरेज करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील असाच एक विवाह सोमवारी ग्रामपंचायत कार्यलयात पार पडला. यासाठी विवाहातील नातेवाईकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी पिंप्री देशमुख ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. कोरोना काळात नोंदणी विवाहाबाबत जनजागृती आणि विवाहसोहळ्यासाठी पुढाकार घेत, सोमवारी पिंप्री देशमुख येथे वर-वधू कडील मंडळींचे मत परिवर्तन करीत पहिला विवाह सोहळा लावण्यात आला.
या विवाहसोहळ्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी मदत झाल्याने, पोलीस प्रशासनाकडूनही अशा पध्दतीच्या विवाह सोहळ्याचे समर्थन केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. मात्र, जवळच्या नातेवाईकांना कसे टाळायचे? असा पेचही अनेकांसमोर उपस्थित होतो. इच्छा नसतानाही लग्न सोहळयात गर्दी होते. पुढे पोलीस कारवाईलाही सामोरे जावे लागते. अशातच कोरोना संक्रमन वाढीस लागण्याचीही दाट शक्यता राहते. त्यामुळे खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख ग्रामपंचायतीच्यावतीने नोंदणी विवाहाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच गावात नोंदणी विवाहासाठी मत परिवर्तन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी गावात ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत पिंप्री देशमुख येथील रामदास संपत वसतकर यांनी आपली मुलगी दिपाली हिचा शेगाव तालुक्यातील बोंडगांव येथील वामन इलामे यांचा मुलगा राहुल यांचा विवाह सोहळा पार पडला.यावेळी ग्रामपंचायत कडून वर वधूंना प्रत्येकी एक वृक्ष रोप तसेच वर-वधू ना पाच हजार रुपये चा धनादेश सुद्धा देण्यात आला याप्रसंगी जर कोणी अशाच प्रकारे गावात विवाह करतील तर त्यांना सुद्धा असाच प्रकारे सन्मान करण्यात येईल असे ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आले.