खामगाव : ‘कोरोना विषाणू’ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा जीवघेणा आजार वेळीच आटोक्यात आणणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलली पाहिजेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोना टेस्ट लॅब सुरू कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तसेच भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केली आहे.
अशोक सोनोने म्हणाले की, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून एक जण दगावला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या उपाययोजना कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर आजाराबाबत तातडीने योग्य उपायोजना करणे गरजेचे झाले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाआजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु प्रत्येक जिल्ह्यात टेस्टची सुविधा नाही, विदर्भातील ११ जिल्ह्यासाठी नागपूरमध्ये एकमात्र लॅब आहे. त्यामुळे या आजाराचे रुग्ण त्वरित डिटेक्ट होणे गरजेचे असल्याने शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत मार्फत कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करणे गरजेचे आहे. सोबतच जे आरोग्य अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय सुरू आहे. आवश्यक असलेली साधनसामग्री सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध नाही. बहुतांश दवाखान्यांमध्ये पिपिटी कीट नाहीत. लोकप्रतिनिधीनी आरोग्य विभागास निधी दिला परंतु आवश्यक साहित्य खरेदी बाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी शासनाने एक प्रकारचा खेळ चालवला असल्याचा आरोपही सोनोने यांनी केला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे.
परंतु यामध्ये शेतकरी, शेतमजूर, निराधार ,अपंग, गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. हातावर पोट आहे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या लोकांचा विचारसुद्धा सरकारने केला पाहिजे. तीन महिने एकत्रित राशन देण्याची घोषणा केली गेली. परंतु अद्याप धान्य वाटप सुरु नाही ते सूरु करावे. अन्नधान्य सोबतच नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू सरकारने पुरवल्या पाहिजेत. पोलीस यंत्रणा रस्त्यावर येऊन काम करत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर असल्याचे सांगून पोलीस पोलिसांना आरोग्यपूरक सुविधा सरकारने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कोरोना कोरणा आजाराच्या संकटकाळात सरकारने जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचेही अशोक सोनोने म्हणाले.
बुलडाणा येथे लॅब आवश्यक – बुलडाणा जिल्ह्यात ५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही, त्यामुळेच बुलडाणा जिल्ह्यात कोरोना टेस्ट करिता लॅब सुरू करणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यासह राज्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत, रिक्त पदांचा बॅकलॉग त्वरित दूर करावा अशी मागणी सुद्धा अशोक सोनोने यांनी केली आहे.