प्रवेशासाठी ३० जुलै पर्यंत मुदतवाढ
खामगाव: इयत्ता १० वी नंतर पॉलीटेक्निक प्रथम वर्ष तसेच आय टी आय व १२ वी नंतर थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला आधीच सुरवात झाली आहे. प्रथम वर्ष पॉलीटेक्निक प्रवेशासाठी तंत्र शिक्षण संचालनालय यांचे निर्देशानुसार अर्ज नोंदणी व निश्चितिसाठी २३ जुलै ही तारीख प्रदर्शित करण्यात आली होती. परंतु आता मात्र ही मुदत ३० जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना अजूनही गुणपत्रिका वितरित झालेल्या नाहीत. सिबीएससी चा सुद्धा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही. तसेच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय कार्यालयातून लागणारे आवश्यक कागदपत्रे मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक प्रवेश साठी साठी अर्ज नोंदणी व निश्चिती करणे शक्य होत नाही आहे. सदर अडचणी लक्षात घेता विद्यार्थ्यांचें शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतुने तंत्रशिक्षण संचालयाने प्रवेश प्रक्रियेकरीता आता ३० जुलै पर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे. वरील तांत्रिक कारणामुळे बुलडाणा जिल्ह्यात पॉलीटेक्निक प्रवेशासाठी केवळ ५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, अर्ज निश्चित फक्त १२४ विद्यार्थ्यांची झालेली आहे. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी ही प्रवेश प्रक्रिया राबवू शकलेले नाहीत.
राज्यामध्ये सुमारे १५ लाखाहून अधिक विद्यार्थी १० वी उत्तीर्ण झाले आहेत, तर पॉलीटेक्निक साठी १ लाख १० हजार जागा उपलब्द आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ३५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. सद्या जिल्ह्यात ७ पॉलीटेक्निक कॉलेज मध्ये सुमारे ११०० जागा उपलब्ध आहेत. प्रवेशेच्छूक विद्यार्थी आपली नोंदणी शासनमान्य सुविधा केंद्रावर जाऊन मोफत करू शकतात. उत्तम रोजगाराची संधी देणारा पॉलीटेक्निक अभ्यासक्रम साठी मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढत असून यावर्षी सुद्धा विद्यार्थी संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सद्या इयत्ता ११ वी प्रवेश साठी प्रवेश परीक्षा राज्य सरकार घेत आहे. अशीच प्रवेश परीक्षा पॉलीटेक्निक साठी पण असेल असा संभ्रम विद्यार्थी व पालकांमध्ये आहे. परंतु असे पॉलीटेक्निक प्रवेश संदर्भात नाडून प्रवेशासाठी कुठलीही प्रवेश पूर्व परीक्षा नाही आहे. फक्त इयत्ता १० वी पास व भारतीय नागरिकत्व असलेला प्रत्येक विद्यार्थी पॉलीटेक्निक प्रवेशासाठी पात्र आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी संभ्रमात न पडता dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन शंकेचे निराकरण करू शकता.