खामगाव : पीक विमा योजनेची तारीख ३१ जुलै पर्यंतच असून बळीराजाला पीक विमा काढण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली. राज्यामध्ये दरवर्षी १ कोटी पेक्षा जास्त शेतकरी पीक विम्याचा लाभ घेत असतात. परंतु यावर्षी कोरोना सारख्या भयंकर संसर्गजन्य रोगामुळे संपूर्ण राज्य लॉकडाऊन होते. शासन आदेशानुसर ३१ जुलै हि पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. अशातच शेतकन्यांना लॉकडाऊन आणि वाहतूक अडथळ्यामुळे ऑनलाइन पीक विमा भरण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामीण भागामध्ये तर इंटरनेटच्या त्रासामुळे शेतकरी वैतागला आहे. दरवर्षी १ कोटी २५ लाख पेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात.यावर्षी कोरोनामुळे आतापर्यंत ६५लाख ४८ हजार शेतकरीच या योजनेचे ऑनलाइन अर्ज सादर करू शकले. जर मुदत वाढ नाही मिळाली तर राज्यातील तब्बल ६० लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील. त्यामुळे खरिपाच्या पीक विम्याची मुदत वाढ ३१ ऑगस्ट पर्यंत करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी पत्राद्वारे केली आहे.