खामगाव : शेतकऱ्यांना पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागत आहे. परंतु मागील ४-५ दिवसापासून पिक विमा अर्जासाठी असलेले संकेतस्थळ चालू बंद होत आहे. सातबारा व ८-अ मिळण्यासाठी तलाठी उपलब्ध होत नाहीत. तर पीक विमा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ असून उपरोक्त अडचणी पाहता पिक विमा साठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे.प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे फार मोठे नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आता फक्त १ रुपयात विमा योजना राबविणे सुरू केले आहे. शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र २५जुलै ते २७ जुलै सायंकाळ पर्यंत पिक विमा साठी असलेली वेबसाईट चालू बंद होत असल्याने ऑनलाईन अर्ज करण्यात व्यत्यय येत आहे. तसेच यासाठी शेतीचा सातबारा व ८ अ ची आवश्यकता असल्याने काही गावात तर तलाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तेव्हा पिक विमा साठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे.