खामगाव / शेगाव : बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले असून यामध्ये खामगाव आणि शेगाव चा देखील समावेश आहे. त्यामुळे याचीच दखल घेत खामगाव आणि शेगाव येथील महसूल, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, नगर परिषद व पोलीस प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायकाय उपाययोजना करण्यात येत आहे याची माहिती घेतली. शहर आढळून आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचे आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्याचे आदेश दिले, त्याचप्रमाणे जे ग्राऊंडलेवलला काम करत आहे अशा आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांचे सुरक्षिततेबाबत नेमकी काय काळजी घेण्यात येते, याबाबतची त्यांनी आवर्जून विचारणा केली.
काम करत असतांना अधिकाऱ्यांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी त्या देखील मनमोकळेपणाने सांगाव्या अशा सूचना त्यांनी केल्या. संचारबंदीच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणारा लहान असो की मोठा त्यावर कडक कारवाही करावी असे आदेश पोलीस प्रशासनाला त्यांनी दिले. खामगाव आणि शेगाव शहरातील परिस्थिती हाताळत असतांना येथील निर्णय घेण्याचे अधिकार नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले. ग्रामीण भागात नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहे याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना शेतीचे काम करतांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अश्या महत्वपूर्ण सूचना पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी आमदार आकाश फुंडकर, पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ, अतिरिक्त एसपी, ईई पीडब्ल्यूडी, तहसीलदार, बीडीओ, वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका आदी उपस्थित होते.