६०० कामगारांवर उपासमारीची वेळ
खामगाव : खामगाव येथील जनुना रोड वरील औद्योगिक वसाहतीत असलेल्या पारले शिवांगी बेकर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे सुमारे सहाशे कामगार तीन शिफ्टमध्ये काम करतात. लॉकडाऊन दरम्यान पार्ले व क्रीम बिस्कीट बनविण्यााचे काम सुरू असताना २२ दिवसाचे वेतन करारानुसार न मिळाल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष व कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. शिवांगी बेकर्स च्या व्यवस्थापनाला उपविभागीय अधिकारी खामगाव तसेच सरकारी कामगार अधिकारी बुलडाणा यांनी पत्र देऊनही, अधिकाऱ्यांच्या पत्रांना शिवांगी बेकर्स च्या व्यवस्थापनाने केराची टोपली दाखविल्याचा आरोप सात्विक कामगार संघटनेने केला आहे. संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात संघटनेने नमूद केले आहे की सरकारी कामगार अधिकारी बुलडाणा व ३१ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी कामगारांचे वेतन देण्याबाबत लेखी पत्र दिले परंतु व्यवस्थापनाने ८ मे रोजी कामगारांचे वेतन कपात करून पगार दिले. शीवांगी बेकर्स मध्ये काम करणारे कामगार पगारा वर अवलंबून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे असंतोष निर्माण होऊन आज ९ मे रोजी सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत ची शिफ्ट होऊ शकली नाही. शिवांगी बेकर्स यांनी त्वरित निर्णय घेऊन कामगारांना वेतन द्यावे व त्वरित औद्योगिक कलह समाप्त करून उद्योग सुरळीत सुरू ठेवावा अशी मागणी सात्विक कामगार संघटनेने केली आहे.