शेगाव : तालुक्यातील जलंब येथील पशुवैद्यकीय दवाखाना वर्षभरापासून एका कर्मचाऱ्याच्या भरवशावर सुरु आहे. तात्काळ येथील रिक्त पद भरण्याची पशुपालकांची मागणी होत आहे. जलंब येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ च्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त असल्याने केवळ एक कर्मचारी हा दवाखाना सांभाळत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांवर पशुधनाचा उपचार अवलंबून असल्याने पशू पालकांना खाजगी डॉक्टरकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे रिक्त पद भरण्याची मागणी पशु पालकांकडून होत आहे. शेगाव तालुक्यातील जलंब या गावाची लोकसंख्या १२ हजारापेक्षा जास्त असून येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशूंची संख्याही भरमसाठ आहे. पशूंच्या आरोग्याच्या काळजीसाठी येथे जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ सेवेत आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून येथील पशुधन विकास अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे त्याजागी प्रभारी अधिकारी म्हणून डॉ. पटेल कारभार पाहतात. तर डॉ. पटेल यांच्याकडे तालुक्यातील इतरही दवाखान्याचा प्रभार असल्याने त्यांना नियमित येणे शक्य नाही. परिणामी येथे उपलब्ध असलेले भानुदास बोरसे हे एकमेव कर्मचारी हा दवाखाना सांभाळत आहेत.एका कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हा कारभार सूर असल्याने पशुची गैरसोय होत आहे. पशुपालकांना वेळेवर जनावरांचा उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जनावरांचे नियमित लसीकरण तसेच आजार बळावत असतांना डॉक्टरची कमतरता प्रामुख्याने जाणवत आहे.जलंब गावाला लागूनच चार पाच खेडी आहेत. तेथील जनावरेही उपचारासाठी येथेच येतात. तर डॉक्टर उपलब्ध नसल्याने पशुपालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथील अधिकाऱ्याचे रिक्त पद त्वरित भरावे अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
previous post