खामगाव : येथील पशुवैद्यकीय दवाखाना हा गेल्या काही महिन्यांपासून दारुड्यांचा व चहा,सिगरेट पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. नांदुरा रोड वर नवीन सुसज्य अशा पशुवैद्यकीय दवाखानाच्या इमारतीचे लाखो रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याची सोय,जनावरांना औषधे देण्यासाठी कटरा,वीजेची सोय व औषध साठा येथे उपलब्ध करून दिले होते .मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पशुवैद्यकीय दवाखाना च्या बाजूला झाडे झुडपे व गवत व घाण पसरली आहेत. दवाखान्या मध्ये येणारे डॉक्टर सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. दवाखान्याच्या आजूबाजूला गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे डेंगू चे प्रमाण वाढू शकते. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून या दवाखान्याच्या परिसरात दारू,चहा सिगारेट पिणाऱ्यांचा अड्डा बनला असून याठिकाणी सकाळी दवाखान्या च्या बाजूला असलेले चहाच्या दुकानदाराने आपल्या ग्राहकांना बसण्यासाठी दवाखान्याच्या कंपाऊंडच्या आत मधेच खुर्च्या व टेबल लावले आहेत.
याठिकाणी युवक शासकीय कर्मचारी चहा सोबतच सिगरेट पिऊन त्याचे तुकडे चहाचे कप हे त्याठिकाणी टाकून घाणीचे साम्राज्य निर्माण करत आहेत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी काही दारुडे येथील व्हरांडयात बसून दारू पितात व दारूच्या व बिअरच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास व सोबत आणलेली चकण्याची पाकिटे तेथेच टाकून देतात.नियमित येथे रात्रीच्या वेळी दारुडे दारु पिण्यासाठी बसतात त्यांच्यामुळे परिसरात घाण होते, तसेच सामाजिक स्वास्थ सुद्धा बिघडते. वेळेतच दारुड्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे अन्यथा याठिकाणी घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी. तसेच प्रशासनाने सुद्धा या दवाखान्याच्या आजूबाजूला असलेली झाडे झुडपे व घाण साफ करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.