जळगाव : जिल्ह्यात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात १५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यावल तालुक्यातील किनगाव नजीक हा अपघात घडला. साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांच्या वरती मजूर बसले होते. या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे ट्रक उलटा झाल्याचे सांगितले जात आहे.या घटनेची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या ट्रकमध्ये एकूण २१ मजूर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. मृत व जखमी मजुरांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यामधे शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (वय ३०) रा.फकीर वाडा रावेर, सरफराज कासम तडवी (वय ३२) रा.के-हाळा ता.रावेर, नरेंद्र वामन वाघ (वय २५) रा.आभोडा ता.रावेर, डिगंबर माधव सपकाळे (वय ५५) रा. रावेर, दिलदार हुसेन तडवी (वय २०) रा. आभोडा ता.रावेर, संदीप युवराज भालेराव (वय २५) रा. विवरा ता. रावेर, अशोक जगन वाघ (वय ४०) रा. आभोडा ता. रावेर, दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) रा. आभोडा ता. रावेर, गणेश रमेश मोरे (वय ०५) रा. आभोडा ता. रावेर, शारदा रमेश मोरे (वय १५) रा. आभोडा ता. रावेर, सागर अशोक वाघ (वय ०३) रा. आभोडा ता. रावेर, संगीता अशोक वाघ (वय ३५) रा. आभोडा ता. रावेर, सुमनबाई शालीक इंगळे (वय ४५) रा. आभोडा ता. रावेर, कमलबाई रमेश मोरे (वय ४५) रा. आभोडा ता. रावेर, सबनुर हुसेन तडवी (वय ५३) रा. आभोडा ता. रावेर या मजूरांचा मृत्यु झाला आहे.
