April 3, 2025
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर मोताळा राजकीय लोणार विदर्भ व्यापारी शिक्षण शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा

पक्ष,बॅनर नसले तरी माझ्याजवळ जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाचा विचार – संदीप शेळके

शेगावात परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : संदीप शेळके म्हणाले बिझनेस, करिअरसाठी नाही तर शेतकरी, कष्टकऱ्यासाठी राजकारणात आलो

शेगाव : राजकारणात मी बिझनेस किंवा करिअर म्हणून आलेलो नाही. मला माझ्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व्यथा, वेदना दिसतात. माझ्या तरुण भावांच्या रोजगाराच्या समस्या सोडवण्यासाठी मी राजकारणात आलो आहे, असे मत वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केले. येथील गांधी चौकात १५ फेब्रुवारी रोजी आयोजित सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज कापसाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. याबाबत कोणी बोलायला तयार नाही. सहा हजाराच्यावर कापूस घेत नाही. चार हजाराच्यावर सोयाबीन घेत नाही. इकडून तिकडून खेडा खरेदी देऊन टाकली आणि तो व्यापारी जर पळून गेला तर त्याच्यावर स्वतः एखादा लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाने पिकवलेल्या मालाला भाव नाही. आज कोणाचे खेटर कोणाच्या पायात नाही. नेता जनतेकडे पाहायला तयार नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे. शेतकरी, कष्टकऱ्याला नुकसान भरपाई नाही. कापसावर रोगराई आली त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. पिकविमा मिळत नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्याला होल्ड लावून ठेवले. ते पैसे त्याला काढता येत नाही. ज्या लोकांना आपण संसदेमध्ये पाठवले, विधानभवनामध्ये पाठवले ते तोंड उघडायला तयार नाहीत. जर हे सरकार सोयाबीन, कापसाला भाव देऊ शकत नव्हते तर माझ्या बळीराजासाठी एखादे पॅकेज तयार करायला पाहिजे होते. त्याला ती मदत द्यायला पाहिजे होती.बुलडाणा जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कारण आमचा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे . परंतु या लोकांचे याकडे लक्ष नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे. मी राजकारणात येण्यामागचे कारण म्हणजे मी सातत्याने समाजकारणामध्ये काम केले आहे. जिल्ह्यात ४० हजार बचतगटांच्या महिलांचे संघटन बांधले. शेतकऱ्यांना बांधावर खत पोचवण्याचं काम केले. एकाचवेळी तीन हजारांवर बॅग रक्त संकलित केले आहे. पण मला जाणवले की, ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. काही लोक सत्ता भोगतात आणि स्वतःला राजा समजायला लागतात. त्यांना एकदा जनतेने ठणकावून सांगितलं पाहिजे जनता सर्वोच्च आहे. तुम्ही आमदार असाल किंवा खासदार असाल तुम्ही सर्वोच्च नाही. प्रजा सर्वोच्च आहे. जे लोक या पद्धतीने काम करतात ते चुकीचं काम करत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे.अनेक लोक मला म्हणतात तुमच्याजवळ पक्ष नाही, बॅनर नाही. मी त्यांना ठणकावून सांगतो की, पक्ष नसेल, बॅनर नसेल पण माझ्याजवळ जिल्ह्याच्या जनतेचा विकासाचा विचार आहे. मी ५० ठिकाणी संवाद मिळावे घेतले. परिवर्तन पदयात्रा काढली. बुलढाण्याची जगदंबा माता आणि चिखलीची रेणुका माता यांना पायदळ रॅली काढून साकडे घातले. माते आमच्या शेतकऱ्यांच्या कापसाला, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे यासाठी बळ दे अशी याचना केली. जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी बळ दे असे साकडे घातले. कारण ही गरज आहे. आता जर लोकप्रतिनिधी विचारत नसतील तर जनतेने ही लढाई स्वतःच्या हातात घेतली पाहिजे, असेही संदीप शेळके म्हणाले.

पैठणच्या धर्तीवर शेगावात संत विद्यापीठ व्हावे

बुलडाणा जिल्हा हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शामुळे पावन झाला आहे. जनतेने संधी दिल्यास येणाऱ्या काळात पैठणच्या धर्तीवर शेगावमध्ये संत विद्यापीठ झाले पाहिजे. संत साहित्याचा प्रचार झाला पाहिजे. संतसंग मिळाला पाहिजे, वारकरी संप्रदायाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण काम करणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी नाहीत. आमच्या जिल्ह्यातून अनेक बेरोजगार युवकांना आजही मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, चाकण याठिकाणी कामाला जावे लागते. खामगावची एमआयडीसी फार जुनी झाली आहे. तिथे विस्तारित एमआयडीसी झाली नाही, असे संदीप शेळके म्हणाले.

सन्माननिधी नको शेतमालास भाव द्या

राजकारण्यांनी ७६ वर्षांमध्ये केले तरी काय? आजही आपला विकास रस्ते आणि नाल्यांवर अडकलेला आहे. ते काम तर ग्रामपंचायत, नगरपालिका करून घेईल. त्याला आमदार, खासदाराची काय गरज आहे? संसदेत शेतकऱ्याच्या हिताचे धोरण तयार केले पाहिजे.सन्माननिधी काय देता, शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर तोच त्याच्यासाठी खरा सन्मान आहे, असे विचार संदीप शेळके यांनी मांडले.

Related posts

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर गुन्हा दाखल

nirbhid swarajya

दोन गटात तुफान हाणामारी ; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

जलंब सरपंचांनी कमिशनरूपी भ्रष्टाचाराच्या पैशातून केलेल्या कामाची चौकशी करावी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!