शेतकरी बांधवांनो नमस्कार ,
सत्तेच्या स्वार्थासाठी दिल्लीवर चढाई करणारे अनेक पुढारी आम्ही पाहिलेत, परंतु इतक्या मोठ्या संख्येने स्वतःच्या न्यायहक्कांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीवर आक्रमण केलेलं आम्ही देशाच्या इतिहासात प्रथमच पाहतोय आणि ती हिंमत दाखवल्याबद्दल आम्ही तुमचे ऋण व्यक्त करतो.उद्या कदाचित तुमच्या ऐतिहासिक आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जाईल, तुम्हाला खलिस्तान-पाकिस्तानचे समर्थक म्हणून हिनवले जाईल..पण त्याची फिकीर करू नका, या देशातल्या प्रत्येक शेतकरीपुत्राचा तुमच्यावर ठाम विश्वास आहे.तुमचे पाच वर्षाचे ‘चिमुरडे पोरगे’ हातात शेतकरी चळवळीचा झेंडा घेऊन जाताना पाहिले आणि समाधान वाटले की निदान तुमच्याकडे तरी ‘भगतसिंग’अजून जिवंत आहे. दुःख फक्त हेच वाटते की तुमच्या पाच वर्षांच्या पोराला जे समजले, ते आमच्या ‘तिशीतल्या पोराला’ का समजत नाही ??त्यासाठी एखादे ‘चौधरी चरणसिंग’ आमच्याकडे सुद्धा जन्माला यायला हवे होते..! तुमचे हे संघटन पाहून आम्हाला विश्वास आलाय की ‘शेतकरी एकत्र येऊ शकतात’.. आज तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला आम्ही येऊ शकत नाही, कारण आमची बांधणी अजून तेवढी मजबूत नाही, पण किमान एक हजार सच्च्या शेतकरीपुत्रांना घेऊन येण्याची तयारी आम्ही करत आहोंत..! खरेतर अशा निर्णायक वेळी देशातल्या प्रत्येक ‘प्रस्थापित’ शेतकरी नेत्याने तुमच्या सोबत यायला हवे होते, आदरणीय ‘शरद जोशी’ जिवंत असते तर ते नक्कीच महाराष्ट्रातून आले असते,चुकून एखादा बच्चू कडू येईलही, पण आमचे इतर शेतकरी नेते सध्या आमदारकीसाठी राजभवनाच्या ‘धोतरधारी बाबांकडे’ फेऱ्या मारण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे वेळ नाही ,म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी आपली माफी मागतो.नुकतेच आमच्या जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्यांची तीन मुले विजेचा शॉक लागून मरण पावली.. संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले..असे जर तुमच्याकडे घडले असते, तर तुमचे शेतकरी नेते पेटून उठले असते.. पण आम्ही एवढे दुर्दैवी आहोत की ‘सत्ताधाऱ्यांचा रोष नको’ म्हणून आमचे शेतकरी नेते त्या कुटुंबाला भेटायला सुद्धा जात नाहीत.. ही आमच्या शेतकरी चळवळीची अवस्था आहे ..पण आम्हाला विश्वास आहे की आमची तरुण शेतकरी मुले हे चित्र लवकरच बदलून दाखवतील.भविष्यात आम्ही सुद्धा प्रचंड ताकदीने आपल्या सोबत उभे राहू हा विश्वास देऊन आपले आंदोलन यशस्वी व्हावे आणि तुम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो..
आपला विश्वासू
यशवंत गोसावी
अध्यक्ष : किसान युवा क्रांती संघटना
मो. 84 46 46 84 46